अडीच वर्षात ११०० कोटीच्या विकासाची हंडी रचली सरकार जरी बदलले, तरी विकासाचे आणखी थर रचणारच – ना. आशुतोष काळे
कोपरगाव प्रतिनिधी:----- मतदारसंघातील सुज्ञ मतदारांनी सेवा करण्याची दिलेली संधी आशीर्वाद समजून मागील अडीच वर्षात मतदार संघात अकराशे कोटीच्या विकासाची हंडी रचली. सरकार जरी बदलले, तरी विकासाचे आणखी थर रचणारच असा ठाम विश्वास श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘विकासाची दहीहंडी’ कार्यक्रमात हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांना दिला.
कोपरगाव शहरात ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल दोन वर्षाच्या कालखंडानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने ‘विकासाची दहीहंडी’ उत्सव ना. आशुतोष काळे व सिने अभिनेत्री माधुरी पवार यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी दहीहंडी उत्सवास प्रारंभ करण्यापूर्वी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास ना.आशुतोष काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कोरोना काळात व आजपर्यंत दिवंगत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.विद्युत रोषणाईने सजविलेल्या दहीहंडीची आकर्षक सजावटीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते, हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायाने गोविंदा पथकांचा उत्साह वाढविला. जीवघेण्या कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सर्व प्रकारचे निर्बंध उठवण्यात आले असल्यामुळे तब्बल दोन वर्षांनी होत असलेल्या दहीहंडी उत्सवाला गोविंदा पथकांनी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व नागरिकांचा देखील तेवढाच अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यामुळे अलोट गर्दी झाली होती. श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बसस्थानक या परिसरात पाय ठेवायला जागा नव्हती. नागरिकांनी जागा मिळेल त्या ठिकाणी इमारतीच्या बाल्कनीत उभे राहून दहीहंडी उत्सवाचा आनंद घेतला यावेळी महिलांची संख्या देखील लक्षणीय होती. गोविंदा पथकातील गोविंदांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली होती.
यावेळी पुढे बोलतांना ना. आशुतोष म्हणाले की, निवडून आल्यापासून मतदार संघाचा विकास करण्यासाठी सातत्याने केलेला अथक पाठपुरावा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सहकार्यातून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून केलेला विकास जनतेने पाहिला आहे. मागील काही दिवसांपूर्वी राज्यात राजकीय बदल झाले असले तरी सत्ता नसतांना देखील विकासकामे होवू शकतात हे माजी आमदार अशोकराव काळे यांनी २००४ ते २०१४ या कालावधीत मतदार संघातील जनतेला दाखवून दिले आहे जनतेने ते अनुभवले आहे. त्यामुळे राज्यात सरकार कुणाचेही असले तरी त्याचा विकासावर परिणाम होणार नसून मतदार संघाचा विकास कधीही थांबु देणार नाही. ज्या प्रमाणे दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथक थरावर थर लावतात त्याप्रमाणे यापुढील काळात देखील मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विकासाचे आणखी थर रचणार असल्याचे ना.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
या दहीहंडी उत्सवामध्ये ढोल ताशांचा गजर गोविंदा पथकांचा उत्साह वाढवीत होते. अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेवून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश मिळाले नाही. परंतु इगतपुरी येथील श्री संग्राम पथक दहीहंडी पर्यंत पोहोचल्यामुळे त्यांना ५१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येवून ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते ‘विकासाची दहीहंडी’ फोडण्यात आली.यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, सर्व संचालक मंडळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, दहीहंडी उत्सव कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, गोविंदा पथके व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments