कोपरगाव मतदार संघातील कब्रस्थान व ईदगाहच्या
विकासासाठी १ कोटी निधी मंजूर – ना. आशुतोष काळे
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:--- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील कब्रस्थान व ईदगाहमध्ये सोयी-सुविधांचा अभाव असल्यामुळे मुस्लीम बांधवाना अडचणी येत होत्या. त्यामुळे मतदार संघातील मुस्लीम बांधवांनी कब्रस्थान व ईदगाहच्या अडचणी ना. आशुतोष काळे यांच्याकडे मांडल्या होत्या. त्या अडचणींची त्यांनी गांभीर्याने दखल घेवून अल्पसंख्यांक विभागाकडे कब्रस्थान व ईदगाहच्या विकासासाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची दखल घेवून अल्पसंख्यांक विभागाने कोपरगाव मतदार संघातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्रातील कब्रस्थान व ईदगाहच्या विकासासाठी १ कोटी निधी मंजूर केला असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक कब्रस्थान व ईदगाह मैदानांना संरक्षक भिंत नव्हत्या. माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात सुरेगाव, चास नळी, धामोरी आणि चांदेकसारे या गावातील कब्रस्थान व ईदगाह मैदानांच्या संरक्षक भिंत बांधण्यासाठी प्रत्येकी १० लाख रुपये निधी दिला होता. परंतु मागील वर्षात कोणत्याही प्रकारचा निधी ग्रामीण भागातील कब्रस्थान व ईदगाह मैदानांना निधी मिळाला नाही. त्यामुळे कब्रस्थान व ईदगाह मैदानांच्या अडचणी वाढल्या होत्या. यामध्ये संरक्षक भिंत नसल्यामुळे कब्रस्थानमध्ये मोकाट जनावरांचा मुक्तसंचार सुरु होता. त्यामुळे दफनविधीच्या वेळी अनेक समस्या निर्माण होत्या. या समस्यांची दखल घेवून ना. आशुतोष काळे यांनी निधी मिळविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून १ कोटीचा निधी या कब्रस्थान व ईदगाह मैदानांच्या अडचणी सोडविण्यासाठी ना. आशुतोष काळे यांनी मिळविला आहे. यामध्ये धामोरी येथील कब्रस्थान संरक्षक भिंत बांधणे (१५ लाख), माहेगाव देशमुख येथील कब्रस्थान संरक्षक भिंत बांधणे (१५ लाख), करंजी येथील कब्रस्थान संरक्षक भिंत बांधणे (१० लाख),वाकडी येथील कब्रस्थान संरक्षक भिंत बांधणे (१० लाख), वेस येथील कब्रस्थान संरक्षक भिंत बांधणे (१० लाख), पुणतांबा येथील ईदगाह मैदान पेव्हर ब्लॉक बसविणे (१० लाख), कोकमठाण येथील कब्रस्थान संरक्षक भिंत बांधणे (१० लाख), सुरेगाव येथील कब्रस्थान मंडपस्थळाचे कॉंक्रीटीकरण करणे (१०लाख) व सुरेगाव येथील अल्पसंख्याक वस्तीमध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे व सुशोभिकरण करणे (१० लाख) आदी कामांचा समावेश आहे. मुस्लीम बांधवांच्या अनेक वर्षापासूनचा अत्यंत महत्वाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मतदार वरील गावासह मतदार संघातील मुस्लीम बांधवांनी ना.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.
चौकट :-सर्वधर्म समभाव हि विचारसरणी डोळ्यासमोर ठेवून राज्यातील महाविकास आघाडी सरकार सर्व घटकांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे. अडीच वर्षात मी देखील सर्व समाजाच्या अडचणी सोडवून त्या-त्या समाजाच्या समाजमंदीरासाठी निधी दिला आहे. कब्रस्थान व ईदगाह मैदानांची झालेली दुरावस्था सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना रमजानच्या पवित्र महिन्यात यश मिळाले आहे याचा आनंद वाटतो. माझ्याकडून मुस्लीम बांधवांना रमजानच्या पवित्र महिन्याची हि भेट असून उर्वरित कब्रस्थान व ईदगाह मैदानांसाठी देखील निधी मिळविण्यासाठी माझे प्रयत्न सुरु राहतील - ना. आशुतोष काळे
0 Comments