कोपरगाव विधानसभा मतदार संघातील तीर्थक्षेत्र विकासाला ३.१९ कोटी निधी मंजूर – ना. आशुतोष काळे
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:---- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या विविध देवस्थानांना पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून ३ कोटी १९ लाख ८८ हजार निधी मंजूर झाला असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
मतदार संघातील अनेक पौराणिक व जागृत देवस्थान असून विविध देवस्थानाच्या ठिकाणी भाविकांची वर्षभर मांदियाळी असते. मात्र या देवस्थानाच्या ठिकाणी भाविकांना आवश्यक सोयी सुविधा मिळ्त नसल्यामुळे या देवस्थानांचा विकास करण्यासाठी या देवस्थानांना ‘क’ वर्ग दर्जा मिळणे गरजेचे होते. त्याबाबत ना. आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून मतदार संघातील पोहेगाव येथील श्री मयुरेश्वर गणपती देवस्थान, कोकमठाण येथील श्री. लक्ष्मीमाता मंदिर व ब्राम्हणगाव श्री जगदंबा माता मंदिर देवस्थानास महाविकास आघाडी सरकारने ‘क’ वर्ग दर्जा मंजूर केला आहे. या देवस्थानांना पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून निधी मिळावा यासाठी ना. आशुतोष काळे प्रयत्न करीत होते. त्या प्रयत्नांना यश मिळाले असून पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून ३ कोटी १९ लाख ८८ हजार निधी मंजूर करण्यात आला आहे.
यामध्ये पोहेगाव येथील श्री मयुरेश्वर गणपती देवस्थान (४९.९७ लाख), पुणतांबा येथील श्री चांगदेव महाराज समाधी मंदिर (९९.९९ लाख), माहेगाव देशमुख येथील श्री दत्त मंदिर देवस्थान (४९.९७ लाख), प्रती जेजुरी अशी ओळख असलेल्या वाकडी येथील खंडोबा मंदिर देवस्थान (१९.९८ लाख), कोकमठाण येथील लक्ष्मी माता मंदिर देवस्थान (४९.९८ लाख) व चांदेकसारे येथील श्री भैरवनाथ मंदिर देवस्थान (४९.९९ लाख) या देवस्थानांचा समावेश आहे. या निधीतून या देवस्थानांचा परिसर सुशोभिकरण करण्यात येणार असून भाविकांसाठी सोयी सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील देवस्थानांच्या विकासासाठी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. त्यामुळे मागील काही वर्षापासून विकासापासून उपेक्षित असणाऱ्या देवस्थानांचा विकास होणार आहे. त्यामुळे हि देवस्थान असलेल्या गावासह पंचक्रोशीतील नागरिकांनी व या देवस्थानावर श्रद्धा असणाऱ्या असंख्य भाविकांसाठी हि अतिशय आनंददायी बाब आहे. या देवस्थानाच्या विकासासाठी निधी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ, पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे, पर्यटन राज्य मंत्री ना. अदिती तटकरे यांचे ना.आशुतोष काळे यांनी मतदार संघातील जनतेच्या वतीने आभार मानले आहे
0 Comments