कोपरगाव प्रतिनिधी:----- समन्यायी पाणी वाटप कायद्याचा मसुदा हा २००३ साली तयार झाला होता. त्यावेळी ज्येष्ठ नेते शंकररावजी कोल्हे तालुक्याचे आमदार होते. त्यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षाचा आमदार या नात्याने जर समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या मसुद्याला त्याच वेळी विरोध केला असता तर समन्यायी पाणी वाटप कायदाच अस्तित्वात आला नसता. परंतु विरोध करायचे सोडाच या कायद्याची हेरिंग देखील या ज्येष्ठ नेत्यांनी त्यावेळी मेरी (जलसंपदा विभाग,महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था,नासिक) येथे घेतली आहे त्यामुळे समन्यायी पाणी वाटप कायद्याच पाप हे तुमचंच आहे ते पाप दुसऱ्याच्या माथी मारू नका असा सणसणीत टोला भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ चांदगुडे यांनी कोल्हेंना लगावला आहे.
कोल्हे हस्तकांच्या पाणी वाटप कायद्याला मूक संमती दिल्याच्या आरोपचे खंडन करतांना, सोमनाथ चांदगुडे यांनी समन्यायी पाणी वाटप कायद्याचे सूत्रधार असलेले विरोधकच चुकीचे आरोप करून दुसऱ्याकडे बोट दाखवीत असले तरी, चार बोटे मात्र त्यांच्याकडे असल्याचे म्हटले आहे. समन्यायी पाणी वाटप कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी या कायद्याचा मसुदा २००३ ला तयार करण्यात आला त्यावेळी ज्येष्ठ आमदार या नात्याने शंकररावजी कोल्हे मसुदा समितीचे सदस्य होते. या कायद्यामुळे अगोदरच तुटीच्या असलेल्या गोदावरी लाभक्षेत्रावर अन्याय होणार याची कल्पना त्यांना आली नाही का? असा सवाल सोमनाथ चांदगुडे यांनी विरोधकांना केला आहे.
समन्यायी पाणी वाटप कायद्याचा मसुदा २००३ ला तयार केल्यानंतर २००५ ला समन्यायी पाणी वाटप कायदा अस्तित्वात आला त्यावेळी माजी आमदार अशोकराव काळे हे विरोधी पक्षाचे आमदार होते. मात्र मतदार संघातील जनतेविषयी खरी तळमळ असणाऱ्या माजी आमदार अशोकराव काळे यांनी सर्वप्रथम समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या विरोधात याचिका माझ्याच नावावर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करून आजही सर्वोच्च न्यायालयात ना. आशुतोष काळे समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या विरोधात लढत आहेत हे देखील विरोधकांनी सांगितले पाहिजे त्यामुळे पूर्वेतिहास चाळण्याची खरी गरज विरोधकांना आहे.
पाणी प्रश्न हा काळे परिवारासाठी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे त्यामुळे १९८४ पासून गोदावरी कालव्याच्या हक्काच्या पाण्यासाठी कर्मवीर शंकररावजी काळे यांनी उभारलेला लढा आजही मा. आ. अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ना. आशुतोष काळे न्यायालयीन लढाई लढत आहेत. याउलट पोटात एक आणि ओठावर एक अशी भूमिका बजावत असलेले विरोधक मात्र टीका करून नेहमीप्रमाणे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करीत आहे. टीका करण्याचा अधिकार लोकशाहीने सगळ्यांना दिला आहे. त्यामुळे टीका करण्याची पात्रता तुम्ही कशाला तपासता. तुमच्यावर लोकशाहीच्या माध्यमातून केलेल्या टीकेचे उत्तर असेल तर द्या. उगाच बिनबुडाचे आरोप करू नका.
चौकट :- गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी ना. आशुतोष काळे यांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळून दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाला हि विरोधकांची पोटदुखी आहे. मागील पाच वर्षात त्यांच्या पक्षाचे सरकार असतांना कालवे दुरुस्तीसाठी त्यांचे सरकार अपयशी ठरले असतांना लाभधारक शेतकऱ्यांनी लोकसहभागातून कालवे दुरुस्तीसाठी मोहीम हाती घेतली. त्यावेळी शेतकऱ्यांची वाढती नाराजी पाहून विद्यमान लोकप्रतिनिधींनी जलसंधारण मंत्र्यांना मतदार संघात आणून कालवे दुरुस्तीसाठी जेसीबी समोर पोतभर नारळ फोडून कालवे दुरुस्तीचा देखावा केला. याला गप्पा म्हणायच्या का थापा? हे जरा आपल्या विवेकशून्य नेतृत्वाला विचारा.-सोमनाथ
0 Comments