घरकुल संदर्भात असलेल्या अडचणी
गटविकास अधिकाऱ्यांकडे तातडीने द्या – सभापती सौ. पोर्णिमा जगधने.
कोपरगाव प्रतिनिधी:---- कोपरगाव तालुक्यात विविध गावात घेण्यात आलेल्या ग्रामसभेत घरकुल लाभार्थ्यांच्या ‘ड’ यादीचे वाचन करण्यात आले आहे. मात्र या यादीबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. अशा नागरिकांनी आपल्या अडचणी व तक्रारी तातडीने गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्याकडे लेखी स्वरूपात द्याव्यात असे आवाहन सभापती सौ. पोर्णिमा जगधने यांनी केले आहे.
हक्काचे घर नसलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या हक्काचा निवारा मिळावा यासाठी शासनाकडून विविध योजनेच्या माध्यमातून शासनाच्या नियमानुसार घरकुल देण्यात येते. त्याबाबत ज्या नागरिकांना स्वत:चे घर नाही अशा नागरिकांचा शासनस्तरावर सर्व्हे होवून त्या नागरिकांची माहिती शासनाकडे सादर केली जाते. त्या माहितीच्या आधारे त्या त्या गावातील पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात येतो व अशा लाभार्थ्यांच्या नावाची यादी ग्रामसभेत वाचन केले जाते. त्याप्रमाणे कोपरगाव तालुक्यात विविध गावात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत घरकुलासाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या ‘ड’ यादीचे वाचन करण्यात आले आहे. मात्र अनेक गावातील नागरिकांचा या यादीबाबत आक्षेप असून त्याबाबत तक्रारी असल्याचे समोर आले आहेत. अशा सर्व तक्रारी दूर करण्यासाठी ज्या नागरिकांना घरकुलासाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या ‘ड’ यादीबाबत आक्षेप आहे. अशा नागरिकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरुपात तातडीने गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्याकडे द्याव्यात असे आवाहन सभापती सौ. पोर्णिमा जगधने यांनी केले आहे.
0 Comments