शिक्षण प्रसारातून माईआजी आजही स्मरणात- आ. आशुतोष काळे.
वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून सुशीलामाईचं
माऊलीपण व मातेचं स्त्रीपणाचं दर्शन घडविण्याचं काम- श्रीपाल सबनीस.
कोपरगाव प्रतिनिधी:---- हजारो मुलींचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होवून अनेक मुली विविध क्षेत्रात उच्च पदावर काम करीत आहे. हे स्व. सौ. सुशीलामाई काळे यांच्यामुळे शक्य झाले असून शिक्षण प्रसारातून माई आजी आजही प्रत्येकाच्या स्मरणात असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी केले.
कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस अॅण्ड संजीवनी कॉलेज कोपरगाव येथे स्व. सौ. सुशिलामाई काळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित २१ व्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, सुनील जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, दिलीप दारुणकर, सौ. ललिता सबनीस प्राचार्य डॉ. शंकरराव थोपटे, उपप्राचार्य डॉ. सुभाष रणधीर, डॉ. राजेंद्र निकम,डॉ. अरुण देशमुख, प्रा. रामभाऊ गमे आदी मान्यवर उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षण मिळाले पाहिजे हे माईआजी अर्थात स्व. सौ. सुशीलामाई काळे यांचे स्वप्न होते. उच्च शिक्षण घेवून मुलींचे भविष्य उज्वल व्हावे व प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने कामगिरी करून मुलींना देखील समाजात मानाचे स्थान मिळावे हा त्यामागे त्यांचा उद्देश होता. तो उद्देश साध्य करण्यासाठी मा. खा. स्व. शंकररावजी काळे साहेब यांच्याकडे सातत्याने आग्रह धरून नगर येथे राधाबाई काळे महिला महाविद्यालय, कोळपेवाडी-सुरेगाव येथे राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर सुरु करण्यास त्यांनी भाग पाडले. त्यामुळे हजारो मुलींनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलतांना प्रमुख अतिथी श्रीपाल सबनीस म्हणाले की, जीवनात परंपरेला,गुणवत्तेला, संस्काराला आणि विज्ञानाला अत्यंत महत्व असून याची सांगड स्व. कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या जीवनप्रवासात दिसून येते. एखादी पत्नी आपल्या पतीच्या ध्येयवादाला किती पचवू शकते आणि त्या ध्येयवादाचं सोनं आपल्या जीवनात कसं करू शकते याचे उत्तम उदाहरण सौ.सुशीलामाई आहेत. त्यांनी केवळ काळे कुटुंबच नव्हे तर कोपरगाव परिसरातील सर्व जनतेच्या प्रती एक आई म्हणून अत्यंत संवेदनशील भूमिका असून सुशीलामाईचं माऊलीपण व मातेचं स्त्रीपणाचं दर्शन घडविण्याचं काम वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वांची तहान भागविणारे, प्रत्येकाच्या सुख-दु:खात सहभागी होवून, सर्वांमध्ये मिसळणारे काळे कुटुंब हि काळे कुटुंबाची वेगळी ओळख आहे. कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी परिसराचा शिक्षणाच्या बाबतीत इतिहास घडवला. त्यांचे जीवन नव्या पिढी साठी प्रेरक असून स्व. सौ. सुशिलामाईंचे चरित्र आणि चारित्र्य सर्व स्त्रियांसाठी मार्गदर्शक असल्याचे श्रीपाल सबनीस यांनी आपल्या मनोगतात सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तविक व स्वागत प्रा. डॉ. बाबासाहेब शेंडगे यांनी केले. प्रा. छाया शिंदे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. डॉ. सुरेश काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी प्राध्यापक-प्राध्यापिका व विद्यार्थी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून उपस्थित होते.
चौकट:- स्व. कर्मवीर शंकररावजी काळे यांचा पाण्याचा संघर्ष सर्वश्रुत आहे. पाण्याचा प्रश्न निर्माण झालेल्या कालखंडात त्यांनी जलसिंचनाचे प्रयोग करून नागरिकांची तहान भागविली, पाण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं. त्यांच्या पावलावर पावूल ठेवत आ. आशुतोष काळे तळ्यांची मालिका गुंफण्याचे काम करीत आहे. एका कर्तृत्व संपन्न मातृत्वाचा व कर्तृत्वाच्या रक्ताचा विचाराचा वारसा चालविण्याचे काम ते करीत असून तालुक्या-तालुक्यात अनेक आमदार आहेत मात्र पाणीदार आमदार म्हणून आज अत्यंत सुशील असणाऱ्या आ. आशुतोष काळे यांच्याकडे पाहिले जाते. – डॉ. श्रीपाल सबनीस
0 Comments