हे काम आम्हीच केले, गडावरून बातमी आल्यास
आश्चर्य वाटून देवू नका – आ. आशुतोष काळे
देर्डे –भरवस- फाटा रस्त्याच्या कामाचा आ. आशुतोष काळेंच्या हस्ते शुभारंभ
कोपरगाव प्रतिनिधी:---- राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून मतदार संघातील प्रत्येक गावापर्यंत विकास पोहोचविण्यात यश मिळाले असून मतदार संघातील अनेक महत्वाच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहे तर काही रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. दोनच वर्षात कोरोना संकटाला न जुमानता कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली व भविष्यात देखील मोठ्या प्रमाणात विकासकामे होणार आहे. परंतु अथक पाठपुरावा करून ज्या विकास कामांना मी मंजुरी मिळवतो त्या कामाचे गडावरून पत्रक येते, काम आम्हीच केले. त्यामुळे आज या रस्त्याच्या बाबतीत देखील हे काम आम्हीच केल्याची बातमी आल्यास आश्चर्य वाटू देवू नका अशी मिश्कील टिप्पणी आ. आशुतोष काळे यांनी विरोधकांवर केली आहे.
कोपरगाव तालुक्यातील रामा ७ देर्डे चांदवड फाटा ते भरवस फाटा या रस्त्याच्या प्रारंभी ५ किलोमीटरच्या रस्त्याचे २ कोटी ५० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन,१५ लक्ष निधीतून देर्डे चांदवड ते शिलेदार वस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे,१७ लक्ष निधीतून बांधण्यात येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या २ शाळा खोल्यांचे भूमिपूजन व १७ लक्ष निधीतून बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या २ खोल्यांचे लोकार्पण नुकतेच आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, संचालक सुनील शिंदे, आनंदराव चव्हाण, काकासाहेब जावळे, कारभारी आगवन, बबनराव शिलेदार, पं.स. सदस्य श्रावण आसने, रोहिदास होन, राहुल रोहमारे, राहुल जगधने, एम.टी. रोहमारे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा सौ. वैशाली आभाळे उपस्थित होत्या.
पुढे बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, निवेदन देवून किंवा प्रसिद्धी पत्रक देवून कोणतीही विकासकामे होत नसतात. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून योग्य वेळी तांत्रिक अडचणी सोडवून हि कामे मार्गी लावावी लागतात. मात्र विरोधकांकडून न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. तांत्रिक अडचणी सोडवायच्या नाही, कोणताही पाठपुरावा करायचा नाही, एखाद्या मंत्र्याला कार्यक्रम प्रंसगी भेटायचे व गडावरून बसून हे काम आम्हीच केल्याच्या बातम्या प्रसिद्ध करायच्या अशी पद्धत सध्या सुरु आहे. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात देखील विरोधकांनी हे करून पाहिले आहे.त्यामुळे गडावर बसून हे काम आम्हीच केले असे पत्रक काढणेचा एककलमी कार्यक्रम सुरु आहे. त्याकडे लक्ष देवू नका हे फंडे आता जुने झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी जवळकेचे सरपंच बाबुराव थोरात, देर्डे चांदवडच्या सरपंच प्रतिभा गायकवाड, उपसरपंच शकुंतला कोल्हे, मढी बु.चे सरपंच प्रविण निंबाळकर, शहाजापूरचे सरपंच सचिन वाबळे, देर्डे कोऱ्हाळेचे सरपंच योगीराज देशमुख, सोनेवाडीचे सरपंच गंगाधर खोमणे, चांगदेव होन, बाबुराव कोल्हे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकरी अभियंता प्रशांत वाकचौरे,पंचायत समिती उपअभियंता एन.जी. गायकवाड, ग्रामसेवक एस.टी. रहाणे आदींसह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.
मा. आ. अशोकराव काळे यांचे विकासाचे सर्व स्वप्न पूर्ण करणार
चौकट :- माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात दूरदृष्टी ठेवून सावळीविहीर फाटा ते भरवस फाटा या मार्गावरील आनंदवाडी, झगडे फाटा खडकी नदी पोलीस चौकीजवळील पूल, उंबरी नदीवरील देर्डे चांदवडचा पूल, गोदावरी कॅनॉलवरील दोन पूल व सात मोऱ्यावरील पुलांची निर्मिती करून मोठ्या रस्त्याच्या निर्मितीकडे वाटचाल सुरु केली होती. परंतु दुर्दैवाने मधील पाच वर्षात आमदार बदलले व सरकारही बदलले. त्यांनी या रस्त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्यामुळे या जनतेला मोठा त्रास सहन करावा लागला आहे. देर्डे फाटा ते भरवस फाटा हा २९ किलोमीटर चा रस्ता आशियायी विकास बँकेच्या माध्यमातून देखील प्रस्तावित आहे. त्याचा डीपीआर मंजूर झालेला आहे. २९ किलोमीटर पर्यत असलेल्या या रस्त्यासाठी १३० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. झगडे फाटा ते वडगाव पान रस्ता देखील प्रस्तावित असून त्या रस्त्याला देखील १३० ते १५० कोटी खर्च अपेक्षित आहे. तो रस्ता देखील ११ मीटर रुंद होणार आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात या रस्त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी पाठपुरावा सुरु आहे. हा रस्ता रुंद करण्याचे मा.आ. अशोकराव काळे यांचे विकासाचे स्वप्न मीच पूर्ण करणार.
–आ.आशुतोष काळे
0 Comments