रस्त्यावर मुरूम टाकण्याची नामुष्की कुणामुळे आली,
सुज्ञ नागरिक नक्कीच विचार करतील – कृष्णा आढाव
![]() |
कोपरगांव प्रतिनिधी:---- कोपरगाव शहराच्या २८ कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी देऊन देखील श्रेय वादाच्या लढाईत कोल्हे गटाच्या सत्ताधारी नगरसेवकांनी या रस्त्याच्या कामांना न्याया लयात नेले त्यामुळे कोपरगाव शहरातील रस्त्यांचे नूतनीकरण करण्याऐवजी या रस्त्यांवर मुरूम टाकावा लागला पालिकेला रस्त्यावर मुरूम टाकण्याची नामुष्की कुणामुळे आली याचा शहरातील सुज्ञ नागरिक नक्कीच विचार करतील असे माजी नगरसेवक कृष्णा आढाव यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
कोपरगाव शहरातील खराब रस्ते हा ऐरणीचा विषय झालेला असतांना या रस्त्यांचे नूतनीकरण करण्यासाठी एकूण २८ विकासकामे पूर्ण करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाला कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी विरोध करून हि होणारी विकासकामे थांबविली. नागरिकांची खराब रस्त्यांमुळे होत असलेली अडचण व या खराब रस्त्यांचा कोपरगावच्या बाजारपेठेवर होत असलेल्या दुष्परिणाम याची दखल घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या व शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे दाद मागितली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील सर्व बाबी पडताळून पाहत कायदेशीररित्या त्यांच्या अधिकारात कलम (३०८) अन्वये नागरिकांचे हित लक्षात घेऊन या विकासकामांना हिरवा कंदील देत कोपरगाव शहरवासीयांना न्याय दिला होता. मात्र शहरवासीयांचा रस्त्यावरील खड्ड्यातला प्रवास थांबवायचा नाही या उद्देशातून विकासकामांचा वाद कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी न्यायलयात नेऊन ठेवला.
पावसाळ्यापूर्वीच सर्वच रस्त्यांची कामे पूर्ण होतील व दरवर्षी पावसाळ्यात खराब रस्त्यांचा होणारा त्रास यावर्षी सोसावा लागणार नाही अशी भाबडी आशा नागरिकांना होती. मात्र रस्त्यांची कामे झाली तर श्रेयापासून वंचित राहू, त्याचा फायदा विरोधकांना होईल या भीतीपोटी काही महिन्यावर येऊन ठेपलेली नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोल्हे गटातील नगरसेवकांनी जाणीवपूर्वक हि विकासकामे कोर्टाच्या कचाट्यात अडकवली.
त्यामुळे आजही शहरवासीयांना पावसाळ्यात रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून आपली वाट शोधावी लागत आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे होणारी विकासकामे थांबल्यामुळे पालिका प्रशासनाने तात्पुरती मलमपट्टी करतांना या रस्त्यांवर मुरूम टाकून सारवासारवी केल्याचा प्रयत्न करून नागरिकांना तात्पुरता दिलासा दिला असला तरी हट्टी व सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी शहरातील नागरिकांना मात्र सोयीस्करपणे विकासापासून दूर ठेवले हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. आपल्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी शहरवासियांना विकासापासुन वंचित ठेवणे योग्य नाही. यामध्ये जेवढा दोष कोल्हे गटाच्या नगरेसवकांचा आहे तेवढाच दोष हा त्यांच्या नेतृत्वाचा देखील आहे हे नाकारून चालणार नाही. ज्या कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी नागरिकांना विकासापासून दूर ठेवले त्यांनाच यापुढे सत्तेपासून दूर ठेवल्यास भविष्यात नागरिकांवर अशी वेळ येणार नाही यासाठी सुज्ञ नागरिकांनी नक्कीच विचार करणे गरजेचे असल्याचे कृष्णा आढाव यांनी शेवटी म्हटले आहे.
चौकट :- कोपरगाव शहरातील प्रत्येक नागरिक हा कोपरगाव नगरपरिषदेला कर भरतो. त्यामुळे या नागरिकांना चांगले रस्ते मिळावे हा त्यांचा हक्क आहे. मात्र सत्तेचा दुरुपयोग करून कर भरणाऱ्या नागरिकांना विकासाच्या सोयी-सुविधा मिळण्यापासून कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी वंचित ठेवून शहरातील जनतेवर अन्याय केला असून आपल्यावर झालेल्या अन्यायाचा नागरिक नक्कीच गांभीर्याने विचार करतील – कृष्णा आढाव.
0 Comments