निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करावा लागतो हे अंगठेबहाद्दर उपनगराध्यक्षांना समजणार नाही – नवाज कुरेशी
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी :----- कोणत्याही विकासकामांसाठी निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. लोकप्रतिनिधी कुणीही असो निधीसाठी पाठपुरावा हा करावाच लागतो व पाठपुरावा केल्यानंतरच मतदार संघातील विकास कामांसाठी निधी मिळतो हे अंगठेबहाद्दर उपनगराध्यक्षांना समजणार नाही अशी टीका कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे अध्यक्ष नवाज कुरेशी यांनी उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी यांच्यावर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.
दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात पुढे असे म्हटले आहे की, मागील पाच वर्षात आपल्या नेत्याने काय दिवे लावले आहे हे आपल्या नेत्यांना विचारा. आपल्या करणीमुळे शहरातील नागरिकांनी आपल्या नेत्याला घरी बसविले आहे. त्यांनी नेहमीच निधी मिळविण्याचा कांगावा केला आहे. तो निधी त्यांनी त्यांच्या घरातून दिला होता का हे त्यांना विचारून निधी मिळविण्यासाठी काय प्रक्रिया असतात ह्या त्यांच्याकडून शिकून घ्या. दुसऱ्यावर आरोप करून नागरिकांचे मनोरंजन करण्यापेक्षा शहरविकासासाठी आपली नकारात्मक भूमिका बाजूला ठेवा. आ. आशुतोष काळे यांनी पाठपुरावा करून कोरोनाच्या जीवघेण्या संकटात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दीडच वर्षात कोपरगाव नगरपरिषदेला १२ कोटी निधी आणला आहे. पुढील काळात शहरविकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळणार आहे हे शहरातील नागरिक जाणून आहेत. मागील पाच वर्षात ज्यांची राज्यात व केंद्रात एकहाती सत्ता असतांना त्यांना जे जमले नाही ते आ. आशुतोष काळे यांनी करून दाखविले आहे. हे मागील पाच वर्षात का शक्य झाले नाही हे अंगठेबहाद्दर उपनगराध्यक्षांनी माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांना विचारले पाहिजे.
कोपरगाव शहरात ज्या प्रभागात विकासकामे केली जातात तो निधी देखील शासनाचाच असतो मात्र प्रभागातील विकासकामांना निधी मिळावा यासाठी त्या-त्या प्रभागातील नगरसेवकालाच पाठपुरावा करावा लागतो हे अंगठेबहाद्दर उपनगराध्यक्षांच्या बुद्धीच्या पलीकडचे असून त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. असे अंगठेबहाद्दर उपनगराध्यक्ष कोपरगाव शहराला भेटले हे कोपरगाव शहराचे दुर्दैव असून ज्यांना स्वताचे नाव कागदावर लिहिता येत नाही त्यांना निधी कसा मिळवावा लागतो याच्या प्रक्रिया काय माहित असणार त्यामुळे असे बालिश वक्तव्य त्यांच्याकडून होणे साहजिकच आहे. त्यामुळे अंगठेबहाद्दर उपनगराध्यक्षांनी अगोदर आपले नाव लिहायचे शिकावे आणि मग दुसऱ्यावर टीका करावी असा सल्ला नवाज कुरेशी यांनी दिला आहे.
चौकट :---- तुम्ही २८ विकासकामांना विरोध केल्यामुळे शहरातील विकास थांबला आहे हे सुजाण नागरिक जाणून आहेत. तुमच्यामुळे शहरातील नागरिकांना कर भरूनही यातना सहन कराव्या लागत आहे. त्यामुळे बातम्या देवून नागरिकांचे मनोरंजन करण्यापेक्षा शहरविकासाला सहकार्य केल्यास निश्चितपणे शहराचा विकास होईल. मात्र नेत्याच्या चुकीच्या आदेशावर विकासकामांना विरोध करणाऱ्या अंगठेबहाद्दर उपनगराध्यक्षांना ही समज नाही ते बालिश आहेत. – नवाज कुरेशी
0 Comments