रानभाज्यांचा खजीना सुरक्षित राहणे काळाची गरज :- आ. आशुतोष काळे
कोपरगाव प्रतिनिधी:--- काही दशकांपूर्वी आहारात रानभाज्यांचा प्रामुख्याने समावेश असल्यामुळे आजारांचे प्रमाण कमी होते. मात्र मागील काही वर्षापासून भाजीपाला पिकविण्यात रासायनिक खतांचा बेसुमार वापर होत असल्यामुळे प्रत्येकाला कोणता तरी आजार जडलेला आहे. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा रानभाज्या आपल्या आहारात आणून आपले आरोग्य अबाधित ठेवायचे असेल तर रानभाज्यांचा खजीना सुरक्षित राहणे काळाची गरज असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
नैसर्गिक रित्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्यांचे महत्त्व व आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या रानभाज्यांची सखोलमाहिती सर्वसामान्य नागरिकांना होण्यासाठी कोपरगाव तहसील कार्यालयात महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'रानभाज्या महोत्सव २०२१' चे उदघाटन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे,तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव,पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकररावजी काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, सहाय्यक कृषी अधिकारी मनोज सोनवणे, सर्व मंडल कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक उपस्थित होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, रानभाज्या कोणतीही लागवड न करता व कोणत्याही प्रकारचे खते व कीटकनाशके न वापरता पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने वाढलेल्या असतात. पूर्वजांना या रानभाज्यांची सखोल माहिती असल्यामुळे त्यांच्या दैनंदिन आहारात या रानभाज्यांचा प्रामुख्याने समावेश राहत असे. त्यामुळे त्यांचे आरोग्य निरोगी होते. मात्रअलीकडच्या काळात मात्र या रानभाज्या अनेकांना माहित नसल्यामुळे या रासायनिक पद्धतीने पिकविलेल्या भाज्या आहारात सर्रासपणे वापरल्या जात असून त्याचे दुष्परिणाम होवून अनेक व्याधी जडत आहेत. त्यामुळे आपले आरोग्य उत्तम रहावे यासाठी अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्याचा आहारात वापर करणे गरजेचे आहे.कोरोना संसर्गामुळे तर या रान भाज्याचे महत्व अधिकच वाढले असून आपल्या भागातील रानभाज्यांचा खजीना सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी जबाबदारी घ्यावीअसे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी यावेळी केले. यावेळी केंद्र शासनाच्या वतीने सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत मंजूर प्रकरणाच्या आदेशाचे पत्र त्यांच्या हस्ते जवळके येथील शेतकरी दादासाहेब थोरात यांना देण्यात आले
0 Comments