मागील वर्षांचा आपत्तीचा अनुभव लक्षात घेवून
आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून नागरिकांना वेळेत मदत करा : आशुतोष काळे
कोपरगाव प्रतिनिधी:------ कोपरगाव तालुक्यात मागील काही वर्षात अनेकवेळा अतिवृष्टीमुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले होते. अशा आपत्तीत जीवित हानी झाली नाही मात्र भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून आपत्ती काळात नागरिकांना वेळेत योग्य ती मदत करा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
तहसील कार्यालय कोपरगाव येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा शुभारंभ आमदार आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, नैसर्गिक संकटे टाळता येत नसली तरी या संकटांपासून होणारे नुकसान टाळणे हे आपल्या हातात आहे. त्यासाठी आपत्तीपूर्वीचे योग्य व्यवस्थापन उपाय योजना व संकटकाळी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून चांदेकसारे,ब्राम्हणगाव, धोत्रे, शहाजापूर, हिंगणी आदी ठिकाणी घडलेल्या आपत्तींची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी पावसाळ्यात पावसाचे पाणी साचले जावून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते अशा ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रशासनाने जलनि:सारण विभागाला योग्य त्या सूचना द्याव्यात. आवश्यक त्या ठिकाणी पावसाळ्यात पाण्याचा निचरा करणाऱ्या ओढ्या, नाल्यांची दुरुस्तीची कामे हाती घेवून वेळेत पूर्ण करावी अशा सूचना दिल्या.
मागील काही वर्षापासून नागरिकांना अतिवृष्टी, महापूर अशा नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. त्यावेळी निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे नागरिकांचे अतोनात हाल होवून आर्थिक नुकसान झाले आहे. भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन कक्षाची निश्चितपणे मोठी मदत होणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.
यावेळी प्रांताधिकारी गोविंदराव शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, कोपरगाव जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार,गोदावरी खोरेचे कार्यकारी संचालक दिलीपजी शिंदे,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे,राजेंद्र वाकचौरे, हाजीमेहमूद सय्यद, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार आपत्ती व्यवस्थापन पथकातील कर्मचारी आदी उपस्थित होते
0 Comments