शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे व खताची टंचाई जाणवणार नाही याची खबरदारी घेवून
खरीप हंगाम यशस्वी करा – आमदार आशुतोष काळे
कोपरगांव प्रतिनिधी:----- शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या ध्येय-धोरणांमुळे सोयाबीनला उंचांकी ऐतिहासिक दर मिळाला असल्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांनी मागील खरीप हंगामातील सोयाबीन विकले आहे. तसेच मागील वर्षी अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी शेकडो हेक्टर सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्यामुळे यावर्षी सोयाबीन बियाण्यांची टंचाई जाणवणार आहे. त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कोरोना संकटामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रासायनिक खतांचा पुरवठा वेळेत झाला नाही तर आवश्यक खतांचा देखील तुटवडा निर्माण होवू शकतो. या शक्यता गृहीत धरून जिल्हा कृषी अधीक्षक व महाबीजने समन्वय ठेवून सोयाबीन उत्पन्न घेण्यात जिल्ह्यात अग्रभागी असणाऱ्या कोपरगाव तालुक्यात सोयाबीन बियाणे व खताची टंचाई जाणवणार नाही कुठेही बियाणे अथवा खतांची साठेबाजी होणार नाही याची खबरदारी घेवून खरीप हंगाम यशस्वी करावा अशा मार्गदर्शक सूचना आमदार आशुतोष काळे यांनी खरीप हंगाम २०२१/२२ च्या खरीप आढावा बैठकीत कृषी विभागाला दिल्या.
२०२१-२२ ची कोपरगाव तालुक्याची खरीप हंगाम नियोजन व आढावा सभा नुकतीच आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने पार पडली. या आढावा सभेसाठी उपसभापती अर्जुनराव काळे, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, कारभारी आगवण, सौ. सोनाली साबळे, दिलीप शिंदे, विठ्ठल जावळे, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव,कृषी अधिकारी मनोज सोनवणे, मंडल कृषी अधिकारी चांगदेव जवणे, सौ. माधुरी गावडे, अविनाश चंदन, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक शैलेश आहेर तसेच सर्व कृषी पर्यवेक्षक व सहाय्यक ऑनलाईन सहभागी झाले होते.
तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी २०२१-२२ चा खरीप हंगाम नियोजन आढावा सभेत मांडल्यानंतर कृषी विभागाला मार्गदर्शन करतांना आ. आशुतोष काळे पुढे म्हणाले की,कोपरगाव तालुक्यातील खरीप हंगाम २०२०/२१ मध्ये सोयाबीन पिकाच्या काढणीवेळी शेतकऱ्यांना अवकाळी पावसाच्या संकटाला सामोरं जावं लागलं. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पिक भिजल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना जीवघेण्या कोरोना संकटाच्या कठीण परिस्थितीतही महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत मिळवून देवून दिलासा दिला आहे. यावर्षी जवळपास ९८ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यावर्षी सोयाबीनला मिळालेला उंचांकी दर पाहता दरवर्षीपेक्षा यावर्षी सोयाबीन क्षेत्र वाढणार आहे त दृष्टीने कृषी विभागाने सजग राहावे. सोयाबीन बियाणाच्या दरामध्ये यावर्षी शासनाकडून कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही तसेच १५ मे पर्यंत आहे त्या किमतीमध्ये रासायनिक खतांची विक्री करण्याच्या सरकारने सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आहे त्या दरात रासायनिक खतांचा व बियाण्यांचा पुरवठा होईल याची दक्षता घ्यावी. कृषी आयुक्त यांच्या आदेशानुसार अनुदानित परमिट बियाणे घेण्यासाठी १५ मे पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अधिकृत नोदणी करणे आवश्यक आहे. मात्र सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे करण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे शेतकरी सेतू केंद्र अथवा आपले सरकार सेवा केंद्र कार्यालयात जावू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीने बियाणे परमिट देण्याची व्यवस्था जिल्हा कृषी अधीक्षक यांनी करावी त्यासाठी कृषी विभागाणे पाठपुरावा करावा. खरीप हंगामपूर्व व खरीप हंगामातील सर्व मोहिमांचे तसेच पीक कापणी प्रयोगांचे अद्यावत रेकॉर्ड तयार करून ते संगणकीय पद्धतीने संग्रहित करावे जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यास मदत होईल.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खते बी-बियाणे यासंदर्भात शेतकऱ्याला अडचण होणार नाही अशा पद्धतीचे नियोजन करावे. शेतकरी अडचणीत असून खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी राष्ट्रीयकृत व विविध बँकांनी देखील सहकार्य करावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी केले.
0 Comments