कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे श्री साईबाबां मंदिर बंद
![]() |
![]() |
शिर्डी प्रतिनिधी:----- देशातील व राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने दिनांक ०४ एप्रिल २०२१ च्या कोवीड-१९ संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना केल्या असून ५ एप्रिल २०२१ रोजी रात्रौ ०८.०० वाजेपासून पुढील आदेशापर्यंत श्री साईबाबा समाधी मंदिर दर्शनाकरीता बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच याकाळात मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम नेहमीप्रमाणे सुरु राहतील अशी माहिती संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली.
.ठाकरे म्हणाले, श्री क्षेत्र शिर्डी हे देशातील नंबर दोनचे देवस्थान असून श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरीता देशाच्या व जगाच्या कानाकोप-यातुन भक्त दर्शनाकरीता शिर्डी येथे येत असतात. त्यामुळे मंदिर व मंदिर परिसरात मोठी वर्दळ होत असते. गेल्या वर्षी जगभरात व देशात आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे दिनांक १७ मार्च २०२० रोजी श्रीं चे समाधी मंदिर बंद करण्यात आले होते. त्यानंतर दिनांक १४ नोव्हेंबर २०२० रोजी राज्य शासनाच्या आदेशान्वये दिनांक १६ नोव्हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्यात आले होते. परंतु सध्या पुन्हा राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. यामध्ये धार्मिक स्थळे, सामाजिक ठिकाणे आदि ठिकाणी गर्दी होवू नये अथवा करु नये, असे निर्देश देण्यात आलेले आहे. याच पार्श्वभूमीवर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने दिनांक ०५ एप्रिल २०२१ रोजी रात्रौ ०८.०० वाजेपासुन श्री साईबाबा समाधी मंदिर दर्शनाकरीता साईभक्तांना बंद ठेण्यात येणार आहेत. या दरम्यान समाधी मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम सुरु राहतील यामध्ये कुठलाही खंड पडणार नाही.
याबरोबरच संस्थानचे श्री साईप्रसादालय व भक्तनिवासस्थाने ही बंद ठेवण्यात येणार आहे. संकेतस्थळावरुन ऑनलाईन दर्शन बुकींग बंद करण्यात आलेले आहेत. याबाबतची माहिती साईभक्तांना ई-मेल, दुरुध्वनी व संकेतस्थळावरुन देण्यात येत आहे. हे सर्व नियम शासनाचे पुढील आदेशापर्यंत सुरु राहणार आहेत. तरी साईभक्तांनी यांची नोंद घेवून सहकार्य करावे,असे आवाहन ही श्री.ठाकरे यांनी केले.
0 Comments