सावळीविहीर-कोपरगाव रस्ता रखडलेली निविदा प्रक्रिया पूर्ण होणार – आमदार आशुतोष काळे
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:----- मृत्यूचा सापळा बनलेल्या सावळीविहीर-कोपरगाव रस्त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येत असलेल्या अडचणीबाबत आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच सार्वजनिक बांधकाम विभाग (रस्ते) सचिव उल्हास देबडवार यांची भेट घेतली असून निविदा प्रसिद्ध करण्यासाठी येत असलेल्या सर्व तांत्रिक अडचणी दूर करून लवकरात लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची ग्वाही सचिव उल्हास देबडवार यांनी आमदार आशुतोष काळे यांना दिली आहे.
सावळीविहीर-कोपरगाव या १०.५०० किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १९ कोटी ३९लाख ४९ हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली असून सदरच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यामुळे निविदा प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे या सावळीविहीर-कोपरगावरस्त्याचे काम सुरु होण्यास विलंब होत असतांना अपघात होण्याचे मात्र थांबत नव्हते. सावळीविहीर-कोपरगाव रस्त्याच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार आशुतोष काळे यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग (रस्ते) सचिव उल्हास देबडवार यांची भेट घेवून त्याच्याशी या रस्त्याचे काम सुरु करण्याबाबत येत असलेल्या अडचणी मांडल्या. त्याबाबत सचिव उल्हास देबडवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपसचिव प्रज्ञा वाळके व अधीक्षक अभियंता जे.डी. कुलकर्णी यांना त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत औटी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून शासनस्तरावर अभिप्राय करण्याच्या सूचना केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या सावळीविहीर-कोपरगावरस्त्याचे काम सुरु करण्यासाठी आवश्यक असलेले ना हरकत प्रमाणपत्र सचिव उल्हास देबडवार यांना पाठविण्यात आले. रस्त्याचे काम सुरु होण्यासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अजूनही ज्या काही तांत्रिक अडचणी असतील त्या अडचणी तातडीने दूर करून या रस्त्याचे काम लवकरात लवकर कसे सुरु होईल यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे सचिव उल्हास देबडवार यांनी आमदार आशुतोष काळे यांना सांगितले आहे.
0 Comments