गौतम पब्लिक स्कूलमध्ये कोविड केअर सेंटर सुरु करण्याबाबत
आमदार आशुतोष काळेंनी केली पाहणी
कोपरगाव प्रतिनिधी:--- कोपरगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे बाधित रुग्णांना मोफत उपचार मिळावे यासाठी पुढील तयारी करण्याच्या दृष्टीने कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूल मध्ये कोविड केअर सेंटर सुरु करण्याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी पुढाकार घेत गौतम पब्लिक स्कूलच्या वसतिगृहामध्ये असलेल्या व्यवस्थेची प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.
कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्यामुळे रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लायन्स मुकबधीर विद्यालय, एस.एस.जी.एम. कॉलेज कोपरगाव व गंभीर रुग्णांसाठी ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे उपचार केले जात आहे. प्रशासनाकडून सर्व प्रकारच्या उपाय योजना करून देखील दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. कोरोना बाधित रुग्णांची दैनंदिन होत असलेली वाढ चिंता वाढविणारी आहे. हि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कोविड केअर सेंटरची संख्या वाढविणे गरजेचे असून बाधित रुग्णांची गैरसोय होवू नये यासाठी निवासी शाळा असलेल्या गौतम पब्लिक स्कूलच्या वसतिगृहामध्ये कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय आमदार आशुतोष काळे यानी घेतला आहे. कोपरगाव तालुक्यासाठी कोपरगाव शहरात कोविड केअर सेंटर आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील कोरोना बाधित रुग्णांसाठी हे कोविड केअर सेंटर दूर अंतरावर आहे. त्यामुळे कुंभारीपासून पश्चिमेच्या गावातील बाधित रुग्णांसाठी जवळच उपचाराची सुविधा व्हावी व कोपरगाव शहरातील कोविड केअर सेंटरवरील भार कमी व्हावा या उद्देशातून गौतम पब्लिक स्कूलच्या वसतिगृहामध्ये कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आमदार आशुतोष काळे यानी म्हटले आहे. गौतम पब्लिक स्कूल वसतिगृहामध्ये ५० बेडचे प्रशस्त चार हॉल असून २०० रुग्णांची याठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे व्यवस्था होणार असून सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध बाधित रुग्णांना या ठिकाणी उपलब्ध होतील. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, पंचायत समिती उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, राहुल जगधने,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी संतोष विधाते,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे, गौतम पब्लिक स्कुलचे मुख्याध्यापक नूर शेख आदी उपस्थित होते
0 Comments