जनतेने नाकारलेले माजी लोकप्रतिनिधी आता भाजप नगरसेवकांच्या माध्यमातून शहरातील जनतेचा बदला घेत आहेत.
राष्ट्रवादी, शिवसेना नगरसेवकांचा आरोप.
पत्रकार परिषद घेवून केला निषेध.
कोपरगाव प्रतिनिधी :- जेव्हा सर्व प्रकारची सत्ता होती त्यावेळी विकास करता आला नाही. कोपरगाव शहराच्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण करायला लावले. त्यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी पाणी प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी पाच नंबर साठवण तलावाचे आंदोलन हाती घेतले. त्यामुळे शहरातील मतदारांनी विधानसभा निवडणुकीत कोपरगाव शहरातून आमदार आशुतोष काळे यांना मताधिक्क्य देवून विधानसभेवर पाठविले. त्यांनीदेखील निवडून येताच तीनच महिन्यात पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु करून नागरिकांची निवड योग्य असल्याचे सिद्ध करून दिले. मात्र विधानसभेत आपल्या नेत्याच्या झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी शहरातील नागरिकांना वेठीस धरून कोपरगाव नगरपरिषदेत पाशवी बहुमत असलेले कोल्हे गटाच्या सत्ताधारी नगरसेवकांकडून शहरविकासात आडकाठी घातली जात आहे. असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना पक्षाच्या नगरसेवकांनी केला असून विकासाचे महत्वाचे विषय नामंजूर केल्यामुळे कोल्हे गटाच्या सत्ताधारी नगरसेवकांचा घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निषेध केला आहे.
कोपरगाव नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा (दि.१६) रोजी तब्बल पाच तास चालली. मात्र या पाच तास चाललेल्या सभेत साडे आठ कोटींच्या रस्त्यांच्या कामांना सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी बहुमताच्या जोरावर मतदान घेवून हे विषय नामंजूर केल्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना पक्षाच्या नगरसेवकांनी गौतम सहकारी बँकेच्या सभागृहात पत्रकार परिषद घेवून कोल्हे गटाच्या सत्ताधारी नगरसेवकांचा निषेध नोंदविला. यावेळी जेष्ठ नेते पद्माकांत कुदळे,धरमशेठ बागरेचा, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष नगरेसवक संदीप वर्पे, गटनेते विरेन बोरावके,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, मंदार पहाडे,संदीप पगारे सौ. माधवी वाकचौरे, हाजीमेहमूद सय्यद, शिवसेनेच्या नगरसेविका सौ. सपना मोरे, सौ. वर्षा शिंगाडे, शिवसेनेचे शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडीयाळ, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष नगरेसवक संदीप वर्पे म्हणाले की, २३ दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्यामुळे आमदार आशुतोष काळे यांनी पाच नबर साठवण तलावाचे काम सुरु करून प्राथमिक स्वरूपातील खोदकाम पूर्ण करून चार ते पाच कोटी रुपये वाचविले. पुढील कामासाठी अंदाजपत्रक तयार करण्यासाठी तांत्रिक सल्लागार नेमण्याची आवश्यकता असतांना कोरोना काळात शासनाने ऑनलाईन सभा घेण्याचे सांगितले त्यावेळी त्या सभेत १३ नगरसेवकांना व्यवस्थित ऐकू येत असतांना सत्ताधारी नगरसेवकांनी आवाज येत नसल्याचे कारण पुढे करून गोधळ घातला. मात्र त्या सभेत तांत्रिक सल्लागार नेमण्यास मजुरी देवून देखील सत्ताधारी नगरसेवकांनी अधिकार नसतांना देखील ते इतिवृत्त नामंजूर करायची भूमिका घ्यायची. एकीकडे पाच नंबर साठवण तलावाबाबत काही म्हणणे नाही सांगायचे व कृती करतांना मात्र उलटी करायची यावरून त्यांच्या पोटात पाच नंबर साठवण तलावाबाबत प्रचंड पोटदुखी असल्याचे दिसून येते. त्यांच्या काळात तीन टक्के आर्किटेक्चर शुल्क अदा केलेले चालते मात्र आज १.८४ टक्केच आर्किटेक्चर शुल्क सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांना जास्त वाटते यावरून त्यांना विकासकामी करण्याविषयी किती आत्मीयता आहे हे दिसून येते. कोणत्याही विकासकामांचे अंदाजपत्रक हे जास्त नाही. दहा वर्षापूर्वी धारणगाव रस्त्याला छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबसाहेब आंबेडकर मैदानापर्यंत एक कोटी चार लाख रुपये लागले आहेत. हे अंदाजपत्रक देखील त्यांच्याच कार्यकर्त्यांनी तयार केले होते त्यांच्याकडून त्यांनी समजून घ्यायला हवे. प्रभाग क्रमांक ५ व ११ मधील एस.जी. विद्यालय ते आचारी हॉस्पिटल या रस्त्याला कोल्हे गटाच्या सत्ताधारी नगरसेवकांनी विरोध केला. मात्र प्रत्यक्षात जेवढे काम होणार आहे तेवढेच बिल अदा केले जाणार आहे हि वस्तुस्थिती त्यांना समजत नाही. केवळ विकासकामांना खोडा घालायचा यासाठी बहुमताच्या जोरावर त्यांनी विकासाचे सर्व विषय नामंजूर केले.हे सर्व कामे१४ व्या वित्त आयोगातील असून १५ व्या वित्त आयोगाचा निधी मिळण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना संकटामुळे हा निधी वर्षभर राहिला मात्र हा निधी खर्च झाला नाह तर ३१ मार्च नंतर हा निधी कदाचित परत जावू शकतो. हा निधी परत गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?असा प्रश्न उपस्थित करून कोल्हे गटाच्या सत्ताधारी नगरसेवकांना शहरविकासाशी देणघेण नाही. याबाबत महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी आमदार आशुतोष काळे यांच्याशी संपर्क करून निधी परत जावू नये याबाबत त्यांना साकडे घातले असून निधी परत जाणार नाही यासाठी आपण मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले असल्याचे संदीप वर्पे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलतांना गटनेते विरेन बोरावके म्हणाले की, पहिल्या स्थायी समितीच्या सभेत सर्व कामे नामंजूर केली. दुसऱ्या स्थायी सभेत सर्व कामांचे नवीन अंदाजपत्रक तयार करण्यास सांगितले. विकासकामांचे अंदाजपत्रक आर्किटेक्चर शुल्क जास्त असल्याची पत्रकबाजी केली. मात्र शासनदराप्रमाणे आर्किटेक्चर शुल्क २ टक्के असतांना प्रत्यक्षात मात्र १.८४ टक्केच आर्किटेक्चर शुल्क अदा केले जाणार होते. याबाबत सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व राष्ट्रवादीचे नगरसेवक जीव तोडून सांगत होते तरीदेखील झोपेचं सोंग घेतलेल्या कोल्हे गटाच्या सत्ताधारी नगरसेवकांनी मतदान घेवून बहुमताच्या जोरावर कामे नामंजूर केली आहे. त्यामुळे ३१ मार्च पर्यंत हा निधी वापरला गेला नाही तर हा निधी परत जावू शकतो. कोपरगाव नगरपरिषदेला वर्षाला जवळपास ९० लाख रुपयांचे वीजबिल येते. त्यामुळे सोलर प्लांट उभारावा जेणेकरून पालिकेचे पैसे वाचतील त्यासाठी बहुमताचा ठराव घेण्यास देखील नकार दिला. आज जरी बहुमताच्या जोरावर विकासकामांना खोडा घातला जात असला तरी भविष्यात कोपरगावची जनता तुमचे बहुमत काढून घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला.
यावेळी नगरसेवक मंदार पहाडे म्हणाले की, कोल्हेंचा पराभव झाल्यापासून कोपरगावच्या नागरिकांवर रोष धरून विकास रोखला जात आहे. शहरविकासाच्या बाबतीत सत्ताधारी नगरसेवकांनी झोपेच सोंग घेतलं आहे.विधानसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी विकासाच्या विरोधात जाणून बुजून मतदान करून विकासाला विरोध करणाऱ्यांना जनता झटका दिल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले म्हणाले की, नागरिकांचे विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी निवडून दिले आहे याचे भान सत्ताधारी नगरसेवकांनी ठेवले पाहिजे. दिड कोटीच्या रस्त्यात भ्रष्टाचार दिसणाऱ्या सत्ताधारी नगरसेवकांना ८८ लाखाच्या गटारीतील भ्रष्टाचार दिसत नाही का?बहुमताच्या जोरावर विकासकामांना विरोध करणारी हि पहिली नगरपरिषद असल्याची खोचक टीका करून नागरिकांना वेठीस न धरण्याचे आवाहन केले.
चौकट:- शहर विकासाच्या नावाखाली आमचे जे नगरसेवक भाजपा बरोबर आहे ते विकासा बरोबर नाही तर ते पाकीटाबरोबर आहे आणि ते स्वताहाला शिवसेना नेते समजतात.
0 Comments