कोपरगाव शहराच्या मुख्य रस्त्यांसह हद्दवाढ झालेल्या भागाच्या विकासासाठी निधी द्या
आ. आशुतोष काळेंची ना. एकनाथ शिंदेकडे मागणी
![]() |
अहमदनगर येथे नुकतेच ना. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर महानगरपालिका व नगरपालिका आढावा बैठक पार पडली. यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराच्या हद्दवाढ झालेल्या भागाच्या विकासाच्या प्रश्नाबरोबरच इतरही विकासाच्या प्रश्नांकडे ना. शिंदे यांचे लक्ष वेधतांना कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पाच नंबर साठवण तलावाचे महत्व लक्षात आणून दिले. प्रस्तावित असलेल्या पाच नंबर साठवण तलावाची तांत्रिक मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. त्या प्रस्तावास आपल्या नगरविकास विभागाकडून मजुरी देवून शहरातील नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्य करावे. तसेच कोपरगाव शहरातील सर्वच मुख्य रस्ते, हद्दवाढ झालेल्या भागातील रस्ते, पाणीपुरवठा व भूमिगत गटारींसाठी निधी मिळावा. कोपरगाव शहरातील शासकीय जागेवर राहत असलेल्या नागरिकांची अतिक्रमणे नियमित होवून सदर जागेचे उतारे त्या रहिवाशांच्या नावावर करून मिळावे आदी मागण्या आमदार आशुतोष काळे यांनी ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्या आहेत. सदर मागण्यांचा विचार करून लवकरात लवकर या मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही ना. एकनाथ शिंदे यांनी आमदार आशुतोष काळे यांना दिली आहे.
याप्रसंगी नगरविकास विभागाचे मुख्य सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अहमदनगर महानगरपालिकेचे महापौर बाबासाहेब वाकळे,नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक वीरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, अजीज शेख, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार आदी उपस्थित होते.
0 Comments