नाशिक: दिवाळीचा सण तोंडावर आला तरी अनेक महिन्यांचे वेतन रखडून राहिल्याने एसटी महामंडळाचे कर्मचारी आता आक्रमक झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार दिले नाही तर आम्ही महामंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करु, असा इशारा इंटकचे अध्यक्ष आणि आमदार जयप्रकाश छाजेड यांनी दिला आहे. त्यामुळे आता हा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या काळात सेवा बंद असल्यामुळे एसटी महामंडळाचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले होते. त्यामुळे जवळपास गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेतनच मिळालेले नाही. कोरोना काळात काम करुनही एसटी कर्मचाऱ्यांना पगार नाही. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही. त्यामुळे संसाराचा गाडा रेटायचा तरी कसा, हा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला आहे. मध्यंतरी एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही विनवणी केली होती. परंतु, अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला गेलेला नाही. त्यामुळे आता कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. कर्मचाऱ्यांचे पगार द्या, 1936च्या कायद्यान्वये महामंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करु, अशी भूमिका ‘इंटक’ने घेतली आहे.
काही दिवसांपूर्वीच राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पगार देण्याचे आश्वासन दिले होते. कर्मचाऱ्यांचे 900 कोटीचे थकीत पगार आणि इतर व्यवस्थांसाठी एसटी महामंडळ दोन हजार कोटींचे कर्ज घेण्याच्या विचार करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, त्यासाठी एसटीच्या काही मालमत्ता गहाण ठेवल्या जाऊ शकतात. यावर भाजपने आक्षेप नोंदवला आहे. राज्य सरकारने कर्ज घेऊन बाँड निर्माण करावेत व एसटीचा कारभार चालवावा. पण एसटीची कुठलीही मालमत्ता गहाण ठेवून पैसे उभारणे योग्य नाही, अशी स्पष्ट भूमिका प्रवीण दरेकर यांनी मांडली होती. कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंगच्या निर्बंधामुळे एसटीतून मर्यादित संख्येपर्यंतच प्रवासी वाहून नेण्याची मुभा होती. यामुळे एसटीला मोठा आर्थिक फटका बसला होता. तिकीटाच्या रक्कमेतून एसटीच्या इंधनाचाही खर्च निघत नव्हता. याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर झाला होता. एसटीचे उत्पन्नच बंद झाल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत.
0 Comments